Pahalgam terror attack Latest Update: "आपल्या देशातील मोठमोठे नेते वारंवार हे म्हणत असतात की, दहशतवादाचा कोणताही धर्म नाही. पण, या घटनेने सिद्ध केलं आहे की, दहशतवादाला धर्म असतो. नेत्यांनी आता असे बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. दहशतवाद्यांनी धर्म विचारून आणि एका विशिष्ट धर्माच्या लोकांना मारले', असा संताप ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मध्य प्रदेशातील सिवनी येथे बोलत असताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल भाष्य केले. 'असं काम राक्षसांशिवाय कुणीच करू शकत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांना राक्षस म्हणणं सुरू केले पाहिजे', असे ते म्हणाले.
'हिंदूंनी यातून धडा घ्यावा आणि पराक्रमासाठी तयार राहावं'
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, 'हिंदूंनी या घटनेतून धडा घ्यायला हवा आणि आपल्या पूर्वजांसारखा पराक्रम दाखवण्यासाठी तयार रहायला हवे. हिंदूंनी या घटनेतून शिकण्याची गरज आहे. हिंदूंना आव्हान दिलं जात आहे. आपली ओळख समजून घ्या आणि पूर्वजांनी केलेला पराक्रम पुन्हा करण्यासाठी तयार रहावं. कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?", असा संतप्त सवाल त्यांनी केला.
अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी सरकारवरही डागली तोफ
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सरकारच्या भूमिकेवरही टीका केली. "ज्या लोकांनी दावा केला की, काश्मिरमध्ये सर्व काही व्यवस्थित झाले आहे. कलम ३७० हटवण्यात आले आहे आणि स्वर्ग भूमीचा आनंद घ्या. त्यांच्यावर दाव्यावर विश्वास ठेवूनच लोक तिथे गेले होते", असे ते म्हणाले.
वाचा >>दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
"सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे की, त्यांच्याकडून कुठे चूक झाली. घटनेनंतर प्रशासन त्यांच्या धाडसाचे ढोल बडवत आहे, पण घटना घडली त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कुठे होती?", असा सवाल अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारला केला आहे.