पहालगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षण तळं उद्ध्वस्त करत मोठी कारवाई केली. यानंतर संपूर्ण पाकिस्तानात हाहाकार माजला आहे. तर, भारतात मात्र आज समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे. आया-बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या क्रूर दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. आता 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सैन्याने केलेली कारवाई दिसली आहे.
मंगळवारी रात्री १:०५ वाजता पाकिस्तान आणि पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतीय सैन्याने हल्लाबोल केला. त्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात अराजकता पसरली आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांवर हल्ला केला आहे. यामध्ये ९० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने केलेली ही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली आणि त्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले.
समोर आला व्हिडीओ!
बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास भारतीय लष्कराने त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये भारतीय लष्कराचे जवान लष्कर-ए-तोयबाचे अड्डे उद्ध्वस्त करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सुमारे ३४ सेकंदांचा आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानातील कोटली येथील अब्बास दहशतवादी छावणीचा आहे. ही छावणी भारतीय नियंत्रण रेषेपासून (POJK) १३ किलोमीटर अंतरावर आहे. लष्कराच्या माहितीनुसार, ही छावणी लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे ५० हून अधिक दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते.
व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये उडाला गोंधळ!
मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमध्ये लोक घाबरले आहेत. भारतीय लष्कराने या कारवाईचा व्हिडीओ प्रसिद्ध केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे. तिथल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.