१२ वर्षाच्या मुलाला दोन दिवसांपासून ताप होता. सुरूवातीला त्याला स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले. पण, ताप काही कमी झाला नाही. त्याची तब्येत आणखी बिघडली. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले. पण, तिथे डॉक्टरांनी बेड उपलब्ध नसल्याचे सांगत भरती करुन घेण्यास नकार दिला. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकाही दिली गेली नाही आणि मुलाने दुसऱ्या रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच बापाच्या खांद्यावर जीव सोडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये. राजर्षि दशरथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला. मुलाला रुग्णालयात भरती करून न घेतल्या प्रकरणात आता अपघात विभागात कार्यरत असलेल्या तीन डॉक्टरांना मंगळवारी एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आणि या प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून मुलाला ताप आणि खोकला
मोहम्मद आरिफ असे मयत मुलाचे नाव आहे, तर मोहम्मद मुनीर असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. मुनीर हरिग्टनगंज येथील रहिवाशी आहेत. मुलाला ताप येत असल्याने त्यांनी मुलाला स्थानिक डॉक्टरकडे दाखवले. पण, ताप आणि खोकला आणखी वाढला. त्यानंतर तब्येत बिघडली. त्यानंतर ते गावाजवळच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये त्याला घेऊन गेले.
तेथील डॉक्टरांनी मुलाला अयोध्येतील शासकीय रुग्णालयात घेऊ जा असे सांगितले. तोपर्यंत मुलाची प्रकृती गंभीर होती. त्याला तातडीने उपचाराची गरज होती. मुलाला घेऊन बाप तिथे पोहचला. ड्युटीवर असलेले डॉक्टर म्हणाले, भरती करून घ्यायला बेडच उपलब्ध नाही आणि ऑक्सिजनही नाहीये. दुसऱ्या दवाखान्यात न्या.
मोहम्मद मुनीर यांची आर्थिक परिस्थिती बिकट, त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकाही दिली गेली नाही. ते मुलाला खांद्यावर घेऊन दुसऱ्या रुग्णालयात गेले. तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी मुलाला तपासले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हे ऐकून मुनीर यांना धक्काच बसला आणि त्यांनी टाहो फोडला.
कामात अक्षम्य दुर्लक्ष
राजर्षि दशरथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य सत्यजित वर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणात तीन डॉक्टर जबाबदार आहे. त्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले असून, चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
हा अक्षम्य दुर्लक्ष केल्या गेल्याचा प्रकार आहे. अपघात विभागात दोन डॉक्टर जास्त ड्युटीवर असताना हे घडले आहे. मी पाहणी करत असतानाही असा प्रकार पाहिला आहे. त्यावेळी मी स्वतः मुलांवर उपचार केले आहेत. रुग्णालयात भरपूर बेड आणि ऑक्सिजन आहे. त्या डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल. आमच्यावर रुग्णांचा ताण आहे, पण तरीही आम्ही करून रुग्णांवर उपचार करत आहोत, असे वर्मा यांनी सांगितले.