Pithoragarh Accident:उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पिथोरागडमध्ये एक गाडी नदीत कोसळल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी आहेत. प्रवाशांनी भरलेली मॅक्स जीप मुवानीहून बोक्ता गावाकडे जात असताना हा अपघात झाला. जीप अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि खोल नदीत कोसळली ज्यामध्ये आठजण जागीच मृत्यूमुखी पडले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी एक मॅक्स जीप नियंत्रण गमावून १५० मीटर खोल नदीत कोसळली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शाळकरी मुलीसह ४ महिलांचा समावेश आहे. तर ५ जण जखमी आहेत. जीपमध्ये एकूण १३ प्रवासी होती. अपघाताची बातमी पसरताच परिसरात शोककळा पसरली आणि स्थानिक लोकांनी प्रशासनासह तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दरीतून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.
संध्याकाळी चारच्या सुमारास ही जीप प्रवाशांना घेऊन मुवानीहून बक्ताकडे जात होती. जीप बक्तापासून थोड्या अंतरावर होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप खड्ड्यात उलटून नदीत पडली. सोनी पुलाजवळ हा अपघात झाला. नदीत कोसळल्याने जीपचा चुराडा झाला. जीपशेजारीच प्रवाशांचे मृतदेह पडले होते. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बचाव पथकाने घटनास्थळावरून ८ मृतदेह बाहेर काढले. मृतांसोबत सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटवली जात आहे.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि मदत आणि बचाव पथकांना बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना वेळेवर, योग्य आणि मोफत वैद्यकीय सुविधा देण्यास सांगितले आहे.