चटपटीत पदार्थ विकणाऱ्या स्टॉलवर खाद्यपदार्थांत पाल, झुरळ आदी गोष्टी सापडल्याचे फोटो, व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. परंतू, एका व्यक्तीला समोस्यामध्ये दाढी करायचे अर्धे ब्लेड सापडले आहे. त्या व्यक्तीने ते न पाहताच तोंडात टाकले असते तर जागेवर जिभेचा तुकडा पडला असता. एवढा हॉरिबल प्रसंग, कल्पना करूनच काटा आणणारा असा राजस्थानमध्ये घडला आहे.
होमगार्ड जवान रमेश वर्मा यांच्यासोबत हा प्रसंग घडला आहे. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील निवाईमध्ये एका समोस्याच्या दुकानात ते नाष्टा करण्यासाठी गेले होते. प्रतिष्ठित जैन नमकीन भंडार येथून त्यांनी कचोरी आणि समोसे घेतले होते.
वर्मा यांनी शनिवारचा प्रसंग सांगितला आहे. त्यांनी पार्सल घेतले आणि घरी गेले. कुटुंबीयांना प्लेटमधून त्यांनी समोसा आणि कचोरी दिली. जेव्हा समोसा तोडला तेव्हा त्यांना आतमध्ये ब्लेड दिसले. त्यांनी तसेच दुकान गाठले, तिथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन पिटाळून लावले. वर्मा यांनी पोलीस ठाणे गाठत दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली आहे.
वर्मा यांनी जिल्हा मुख्यालयातील जिल्हा खाद्य अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर लगेचच विभागाचे अधिकारी सत्यनारायण गुर्जर यांनी दुकानावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. खाद्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ब्लेड असलेला समोसाही जप्त केला आहे. तेथील चटणी आणि इतर खाद्यपदार्थांचेही सँपल घेतले आहे. तसेच या दुकानात घाणेरडेपणा आढळून आल्याने मालकाला नोटीस जारी करण्यात आली आहे. दुसरीकडे पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.