'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठा हल्लाबोल केला. या ऑपरेशननंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या तत्काळ रद्द करण्यात आल्या आहेत.
गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, आता बीएएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफ सारख्या सर्व प्रमुख निमलष्करी दलाच्या जवानांना पूर्ण दक्षतेने कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. यासोबतच, सीमावर्ती भागांमध्ये आता अतिरक्त ताफा तैनात करण्यात येणार आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला!भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान आता चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानने या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्याची धमकी देखील दिली आहे. मात्र, हा निर्णय दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान सीमांवर आता अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत. रेल्वे स्थानके, विमानतळ, मेट्रो आणि संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय संस्था आणि राज्य पोलिसांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
'ऑपरेशन सिंदूर'ने उडवला दहशतवाद्यांचा धुव्वा!ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैनिकांनी पहाटे १.३० वाजता राफेल आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांची प्रशिक्षण शिबिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि ९० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.