बीजिंग : पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये विषाणूमुळे कोरोनाची साथ पसरली. त्यानंतर या साथीने साऱ्या जगात हाहाकार माजविला. त्यानंतर आता चीनमध्ये ह्यूमन मेटाप्रोन्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) प्रसार होत आहे. त्यामुळे होणाऱ्या आजारामुळे लोकांना कोरोनासारखी साथ पुन्हा पसरणार का, अशी भीती वाटू लागली आहे.
या विषाणू प्रसाराबाबत चीनने स्पष्टीकरण दिले असून, घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, परिस्थिती नियंत्रणात असून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणतीही बंधने घालण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये एचएमपीव्ही, इन्फ्लुएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-१९ सारख्या अनेक विषाणूंमुळे लोक आजारी पडत आहेत.
घाबरण्याची गरज नाही : भारत- चीनमध्ये पसरत असलेल्या विषाणूमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने दिले आहे.- हा विषाणू इतर श्वसन संसर्गजन्य विषाणूसारखाच आहे. यात सर्दी होते. यात लहान मुलांमध्ये तापासारखी लक्षणे दिसतात, मात्र योग्य काळजी घेतल्यास सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याची काहीच गरज नसल्याचे सांगण्यात आले.
नेमके काय?चीनमध्ये इन्फ्लुएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-१९ अशा श्वसनविकारांना कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचा प्रसार वाढला आहे. त्यांच्या संसर्गामुळे मुलांची प्रकृती बिघडण्याचे व त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
ही आहेत एचएमपीव्ही विषाणूच्या संसर्गाची महत्त्वाची लक्षणे...एचएमपीव्हीच्या संसर्गात सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणे दिसतात. खोकला, ताप येतो, सर्दी होते. ह्यूमन मेटाप्रोन्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा मेटाप्रोन्युमोव्हायरस जीन्सचा आरएनए विषाणू आहे. त्याच्या बाधेमुळे लहान मुले आणि वृद्ध यांना सर्वांत जास्त त्रास होतो.या आजारांमुळे चिनी अधिकाऱ्यांनी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास, मास्क घालण्यास व हात सॅनिटाईझ करण्यास सांगितले आहे. एचएमपीव्ही विषाणूमुळे झालेला संसर्ग बरा करण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही.