नवी दिल्ली - भारताचाइतिहास सर्वप्रथम वसाहतवाद्यांच्या विकृत दृष्टिकोनातून लिहिण्यात आला, असे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी केले. त्यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हजारो लोकांनी बलिदान दिले; पण, काही लोकांचाच उदोउदो झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही याच पद्धतीने इतिहासाचे लेखन होत राहिले, असे त्यांनी सांगितले.
धनखड म्हणाले की, आता आपल्याला वसाहतवादी दृष्टिकोन तसेच मानसिकतेतून मुक्त होण्याची आवश्यकता आहे. वेदांत, जैन, बौद्ध या विचारप्रणालींनी नेहमीच सुसंवाद व सहअस्तित्वाला प्राधान्य दिले आहे. सध्या विविध गोष्टींवर ध्रुवीकरण सुरू आहे. त्यामुळे समन्वयाला प्राधान्य देणाऱ्या विचारप्रणालींची आवश्यकता अधिक भासते. भारताला खूप मोठा वारसा आहे. त्याच्या महतीत आणखी वाढ होत आहे. भारताचे गणित या विषयात खूप मोठे योगदान आहे. त्याचा युवकांनी अभिमान बाळगला पाहिजे, असेही धनखड म्हणाले.
इंडोलॉजीचा अभ्यास हवा“आज ज्या अनेक समस्यांना आपण सामोरे जात आहोत, त्या द्रुतगतीने सोडविता येतील, जर आपण इंडोलॉजीला ध्यानात ठेवले,” असे उपराष्ट्रपती धनखड यांनी भारतीय विद्या भवन येथे नंदलाल नुवाल सेंटर ऑफ इंडोलॉजीच्या पायाभरणी समारंभानंतर सांगितले.