हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होत आहे. गुरुवारी आनीच्या बखनाओ पंचायतीच्या पुन्न खडजवळ डोंगरावरून दगड पडल्याने रस्त्याने जाणाऱ्या आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
डोंगरावरून दगड पडल्याने रवीना आणि तिचा मुलगा सुजल हे जखमी झाले. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये रवीनाचा जागीच मृत्यू झाला, तर काही वेळाने सुजलचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रवीना आणि सुजल हे कथला गावातील रहिवासी होते. हे दोघे आनी येथून टॅक्सीने पुन्न येथे पोहोचले होते. तिथून त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी पायी प्रवास करायचा होता. ते रस्त्यावरून चालत असतानाच डोंगरावरून काही दगड खाली पडले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तसेच घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले जात आहेत आणि स्थानिक लोकांचीही चौकशी केली जात आहे. सध्या प्रशासन लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करत आहे.
हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये मालमत्तेचे नुकसान झालं आहे. अनेकांना आपली जीव गमवावा लागला आहे. तर काही जण बेपत्ता झाले आहेत.