Himachal Cabinet Meeting: देशात कायदेशीररित्या मुलींच्या लग्नाचे वय 18 आणि मुलांचे 21 वर्षे आहे. पण, अनेकदा मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याची मागणी होत असते. दरम्यान, शुक्रवार(दि.12) हिमाचल प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मुलींच्या लग्नाचे वय 21 करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आमि यावर अंतिम निर्णय होईल.
सर्वात महत्वाचा निर्णयमिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शिमल्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. सुमारे 3 तास चाललेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यातील सर्वात महत्वाचा निर्णय मुलींच्या लग्नासंदर्भातील होता. हिमाचल प्रदेशातील पालक 21 वर्षांनंतरच आपल्या मुलींचे लग्न करू शकतील, असा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाईल.
या बैठकीत हिमाचलमधील नवीन चित्रपट धोरणालाही मंजुरी देण्यासोबतच चित्रपट परिषद स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. नवीन धोरणानुसार हिमाचलमध्ये शूटिंगसाठी आवश्यक परवानग्या आता केवळ तीन दिवसांत दिल्या जातील. याचा फायदा चित्रपट निर्मात्यांना होईल. पूर्वी यासाठी खूप वेळ लागायचा.
मुख्यमंत्री विधवा एकल नारी योजना आणि हिमाचल प्रदेश डिजिटल धोरणालाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय पीरियड बेसिस शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 2600 पदांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 6 वर्षे वयाच्या मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्याचा नियम शिथिल करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.