Pahalgam attack news: दल सरोवरामध्ये एका शिकाऱ्यात ते दोघेही बसले आहेत. त्यांचा काश्मिरातील पर्यटनाचा अनुभव सांगत आहेत. हा व्हिडीओ आहे शिवमोगा येथील मंजूनाथ आणि त्यांची पत्नी पल्लवी यांचा. सुखात काश्मीर फिरत असताना ते पहलगाममधील बैसरन घाटीत पोहोचले, पण तिथून परत फक्त पल्लवीच आल्या! मंजूनाथ यांचा मृतदेहच परतला! दहशतवाद्यांनी मंजूनाथ यांची गोळ्या घालून हत्या केली. त्याचा सोबतचा अखेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहलगाममधील बैसरन घाटीत झालेल्या हल्ल्यात मंजूनाथ यांचा मृत्यू झाला. सुदैवाने त्यांचा मुलगा आणि मुलगी यातून थोडक्यात बचावले. ही भयंकर घटना घडण्यापूर्वी मंजूनाथ पत्नी पल्लवीसोबत श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवरत शिकाऱ्यातून फिरले.
खूपच आनंददायी आहे
पल्लवी आणि मंजूनाथ यांनी शिकारा चालवणाऱ्या मोहम्मद रफीक यांचेही आभार मानले. ते म्हणत आहेत की, आम्ही इंडियन ट्रॅव्हल स्टोअर्सच्या माध्यमातून काश्मीर फिरायला आलोय. शिकाऱ्यात फिरणे खूपच आनंददायी आहे. सगळंच भारी वाटत आहे.
मंजूनाथ आणि पल्लवी यांचा अखेरचा व्हिडीओ
दल सरोवरात फिरून झाल्यानंतर ते काही तासांनी पहलगामला पोहोचले. तिथून ते बैसरन घाटीमध्ये गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला दुपारी २.३० वाजेच्या सुमारास झाला. त्यावेळी अनेक पर्यटक घोडेस्वारीचा आनंद घेत होते. त्याचवेळी अचानक दहशतवादी आले आणि त्यांनी निवडून निवडून गोळ्या झाडल्या.
गोळी लागताच सोडला प्राण
पल्लवी यांनी हल्ल्याबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, 'मंजूनाथ यांना गोळी लागली आणि त्यांनी लगेच प्राण सोडला. माझ्या नजरेसमोर माझ्या पतीला गोळ्या घालण्यात आल्या. मी ओरडून म्हणत होते की, यांना एअरलिफ्ट करा, वाचवा. पण ते नाही वाचले. दहशतवाद्यांनी मलाही मारण्याची धमकी दिली. पण, नंतर म्हणाले, तू जा. जाऊन मोदींना सांग आम्ही हे केलं आहे.'