आझमगढ : सपाची सायकल पंक्चर झाली आहे, तर बसपाच्या हत्तीने सर्व पैसा खाऊन टाकला आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केली. आपले भविष्य बदलण्यासाठी आता ‘हाता’ला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. किसान यात्रेच्या सहाव्या दिवशी येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आपण आता ‘हाता’बाबत विचार करा आणि मग पाहा आम्ही राशन कार्डसाठी, शेतकऱ्यांसाठी काय करतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे एक महिन्याच्या किसान यात्रेला निघालेले आहेत. आपल्या या दौऱ्यात राहुल गांधी हे केंद्रातील मोदी सरकारलाही लक्ष्य करीत आहेत. सूट खराब होईल म्हणून मोदी शेतकऱ्यांच्या घरी जात नाहीत १५ लाखांचा सूट परिधान करून विदेशात फिरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूट खराब होईल म्हणून शेतकऱ्यांच्या घरी जात नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी रविवारी केली. आपल्या किसान यात्रेत गांधी यांनी मुबारकपूर ते अमिलो या रोड शोमध्ये मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी विदेशात फिरणारे नेते आहेत. ते भांडवलदारांचे कर्ज माफ करीत आहेत; शेतकऱ्यांचे कर्ज माफ करीत नाहीत, असेही ते म्हणाले.
हत्तीने खाल्ला पैसा, सायकल झाली पंक्चर
By admin | Updated: September 12, 2016 01:24 IST