हरयाणामधील गुरुग्राम येथील एका टोल नाक्यावर धक्कादायक घटना घडली आहे. येथे टोल वाचवण्यासाठी हरयाणा रोडवेजच्या एका बसच्या चालकाने टोल कर्मचाऱ्यालाच चिरडले. या घटनेत टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुडगावमधील सोहना रोड येथील घामडोज टोल नाक्यावर घडली. या घटनेचं सीसीटीव्ही चित्रिकरण कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
जखमी टोल कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही चित्रिकरणामध्ये टोल नाक्यावर एक कार उभी असल्याचं दिसत आहे. तसेच कारमधील लोकांसोबत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची वाहावादी होताना दिसत आहे. मात्र काही वेळातच कारमधील प्रवासी कार घेऊन पुढे जातात.
त्यावेळी कारच्या मागे उभ्या असलेल्या बसचा चालकही संधी साधून बस पुढे दामटण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथे उभ्या असलेल्या टोल कर्मचाऱ्याला धडक देऊन फरार होतो. आता सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या आधारावर गुरुग्राम पोलिसांनी हरयाा रोडवेजच्या बस चालकाविरोधात तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली की नाही याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, एखाद्या वाहनाने टोल नाक्यावर झालेल्या वादावादीनंतर टोल कर्मचाऱ्याला चिरडल्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत. मात्र टोल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अद्याप सबळ अशा उपाययोजना झालेल्या नाहीत.