अहमदाबाद : पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचा कारागृहात बंदिस्त नेता हार्दिक पटेलच्या कुटुंबीयांना बुधवारी काही काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते, तसेच या समुदायातील नारेबाजी करणाऱ्या सात महिलांना ताब्यात घेण्यात आले. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची एक सभा हार्दिकच्या वीरमगाममध्ये आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री सभेला संबोधित करीत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांचा कार्यक्रम आटोपल्यावर हार्दिकचे कुटुंब आणि या महिला कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली. ठाणेदार विश्वराजसिंग जडेजा यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी खबरदारी म्हणून हार्दिकच्या कुटुंबीयांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री भाषण देत असताना, नारेबाजी करणाऱ्या सात महिलांनाही ताब्यात घेण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांना सोडण्यात आले. नजरकैदेत ठेवलेल्या हार्दिकच्या कुटुंबीयांमध्ये त्याचे वडील भरतभाई, आई उषाबेन आणि बहीण मोनिका यांचा समावेश होता. (वृत्तसंस्था)
हार्दिकचे कुटुंब नजरकैदेत
By admin | Updated: June 17, 2016 02:48 IST