Gyanvapi: ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला. जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी पूजा करण्याची जबाबदारी काशी विश्वनाथ ट्रस्टकडे दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तळघरातील बॅरिकेड्स हटवण्यात आले. मध्यरात्रीच काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी व्यास तळघरात पूजा केली. यानंतर आता ज्ञानवापीत ८ देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, दिवसभरात कधी आरती होणार, पूजन कसे होणार, याचे एक वेळापत्रकच आता समोर आले आहे.
जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर रात्री उशिरा १२.३० वाजता कडक सुरक्षा व्यवस्थेत तळघर खुले करण्यात आले. यानंतर पंचगव्य करत तळघराची शुद्धी करण्यात आली. रात्री २ वाजता षोडषोपचार करत पूजन विधींना सुरुवात करण्यात आली. ज्ञानवापीत प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या देवतांना गंगाजल आणि पंचगव्याने स्नान घालण्यात आले. महागणपतीचे आवाहन करण्यात आले. सर्व मूर्तींना चंदन, फुले, धूप-दीप अर्पण करून आरती करण्यात आली. ही पूजा सुमारे अर्धा तास चालली. पूजनानंतर ज्ञानवापीत आरतीच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. अन्य मंदिरातील आरती परंपरेप्रमाणे येथेही दिवसभरात पाच आरत्या करण्यात येणार आहेत.
कोणत्या देवतांची प्रतिष्ठापना करण्यात आली?
ज्ञानवापीत सुमारे पहाटे ३.३० वाजल्यापासून ते रात्री १०.३० वाजेपर्यंत दिवसभरात ५ वेळा आरती करण्यात येणार आहे. ब्रह्ममुहुर्तावर पहाटे ३.३० वाजता मंगला आरती, दुपारी १२ वाजता भोग आरती, सायंकाळी ४ वाजता अपरान्ह आरती, ७ वाजता सायंकाल आरती आणि रात्री १०.३० वाजता शयन आरती करण्यात येणार आहे. ज्ञानवापीतील व्यास तळघरात गणपती, श्रीविष्णू यांच्या एक, तर हनुमंतांच्या दोन, जोशीमठ येथील दोन प्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर राम नाम लिहिलेली एक वीट स्थापन करण्यात आली आहे. एक मकर आणि एक अखंड ज्योत स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या पूजनाची परवानगी दिल्यानंतर ज्ञानवापी येथे रात्रीपासूनच भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. रात्रीच्या वेळी काही तरुणांनी ज्ञानवापीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साईन बोर्डवर 'ज्ञानवापी मंदिर मार्ग' असे लिहिले. याचा फोटो व्हायरल होत आहे. भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या पाहणीत ज्ञानवापी परिसरात विष्णू, गणेश मूर्ती तसेच शिवलिंग सापडले. हा परिसर मंदिराच्या ढाच्यावर उभा असल्याचे 'पुरातत्त्व'च्या अहवालात नमूद केले. महामुक्ती मंडप नावाचा शिलालेखही सापडल्याचे अहवालात म्हटले. पूर्वी येथे भव्यदिव्य मंदिर होते. १७च्या शतकात औरंगजेबाने मंदिराचे बांधकाम तोडले. त्यात मोठे फेरबदल करण्यात आल्याचे अहवालात म्हटले. भितींवर कमळ, ३ स्वस्तिक, अन्य मूर्तीसह पशू-पक्षी तसेच धार्मिक चिन्ह आढळून आले.