सुरत: बाईकवर स्टंट करण्याची तरुणांमध्ये क्रेज तयार झाली आहे. अनेक ठिकाणी वीशीतले तरुण जीव धोक्यात घालून जीवघेणा स्टंट करत असतात. यात अनेकदा अपघात होऊन गंभीर दुखापत किंवा मृत्यूही होतो. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, या स्टंट करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुण बाईकवर अनेक जीवघेणे स्टंट करत असतात. अशाच प्रकारच्या एका स्टंटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हिडिओत दोन तरुण दिसत आहेत, एक तरुण बुलेट गाडी चालवत आहे तर दुसरा तरुणी त्याच्या खांद्यावर बसून मस्त सिगारेट ओढत आहे. दोघांनी व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी स्टंटबाजी केल्यांचे पोलिसांना सांगितले. शिवाय त्यांच्या हातात जी पिस्तुल दिसत आहे, ती पिस्तुल नसून लायटर असल्याचे समोर आले आहे.
दहशत पसरवणाऱ्या या व्हिडीओला 'खलनायक' हे कॅप्शन दिले आहे. गाडीच्या नंबरवरुन ही गाडी गुजरातमधील असल्याचे दिसतंय. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरात पोलिसांनी या व्हिडीओतील दोन्ही तरुणांवर कारवाई केली आहे. सोशल मीडियावर अशी हवा करणे दोन तरुणांच्या अंगलच आले. पोलीसांच्या कारवाईनंतर या तरुणांचा हात जोडतानाचा फोटो शेअर होत आहे. गुजरातच्या गृहराज्य मंत्र्यांनी ट्विट करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई केल्याची माहिती दिली आहे.