गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील जीआयडीसी पनौली औद्योगिक क्षेत्रात असलेल्या संघवी ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अचानक भीषण आग लागली. आगीचे लोट आणि धुराचं साम्राज्य असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी १५ अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. आगीचं कारण आणि नुकसानीचा नेमका आकडा अद्याप कळालेला नाही.
धूर इतका जास्त होता की, पनौली औद्योगिक क्षेत्रातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. फॅक्ट्रीजवळील परिस्थिती पाहून अनेक लोक बाहेर आले आणि त्यांना मोठा धक्का बसला. अचानक एवढी मोठी आग पाहून भीती वाटल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं.
काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये मोठी आग लागली होती. २ एप्रिल रोजी बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथील एका बेकायदेशीर फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. त्या स्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला, ज्यात मध्य प्रदेशातील अनेक स्थलांतरित कामगारांचा समावेश होता.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, स्फोट इतका जोरदार होता की जवळपासची घरं हादरली. कारखान्याचे काही भाग कोसळले, ज्यामुळे अनेक लोक ढिगाऱ्यात अडकले. स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी वेळीच लोकांना बाहेर काढलं.