Gujarat ATS: ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. देशातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्यांवर सुरक्षा यंत्रणांकडून नजर ठेवली जात आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या आठवड्यात तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांनी गुजरात एटीएसला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. गुजरात एटीएसने बंगळुरू येथून एका महिलेला अटक केली आहे, जिचा अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आलं आहे.
गुजरात एटीएसने अल कायदाशी संबंधित असलेल्या ३० वर्षीय समा परवीन या महिलेलाला बंगळुरू येथून अटक केली. एटीएसने काही दिवसांपूर्वी नोएडा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथून तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. आता त्यांच्याशी संबंधित समा परवीनला अटक करण्यात आली. समा परवीनची अटक हे मोठे यश असल्याचे एटीएसने म्हटलं आहे. गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले की, अल कायदाशी संबंधित असलेल्या बंगळुरू येथील समा परवीन नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएस दुपारी १२ वाजता शमा परवीनच्या अटकेबाबत पत्रकार परिषद घेणार आहे.
या कारवाईबाबत गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनीही प्रतिक्रिया दिली. "गुजरात एटीएसने यापूर्वी ४ एक्यूआयएस दहशतवाद्यांना अटक केली होती. काल, बंगळुरू येथील एका महिलेला अटक करण्यात आली. ती अत्यंत कट्टरपंथी आहे आणि ऑनलाइन दहशतवादी मॉड्यूल चालवत होती. तिच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून महत्त्वाचे पाकिस्तानी फोन नंबर जप्त करण्यात आले आहेत. गुजरात एटीएसने ऑनलाइन दहशतवादी मॉड्यूल चालवणाऱ्या ५ एक्यूआयएस दहशतवाद्यांना अटक केली आहे," असं हर्ष संघवी म्हणाले.
अल-कायदाच्या भारतातील युनिटशी संबंधित एका मोठ्या सोशल मीडिया मॉड्यूलचा पर्दाफाश करताना एटीएसने चार आरोपींना अटक केली होती. गुजरातमधून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तर आणखी दोघांना नोएडा आणि दिल्लीतून ताब्यात घेतलं होतं. गुजरात एटीएसने वेळीच एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे. अटक केलेले सर्व दहशतवादी इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे 'गजवा-ए-हिंद'च्या विचारसरणीच्या नावाखाली भारतात हिंसाचार पसरवण्याचा कट रचत होते. बंगळुरुतून अटक करण्यातआलेली समा परवीन ही या मॉड्यूलची मास्टरमाइंड असल्याचे समोर आलं.
काही इंस्टाग्राम अकाउंट्सद्वारे देशविरोधी आणि चिथावणीखोर गोष्टी पसरवल्या जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या अकाउंट्समधून दहशतवादी सामग्री, व्हिडिओ आणि एक्यूआयएसची विचारसरणी शेअर केली जात होती. ज्याचा उद्देश देशातील मुस्लिम तरुणांना भडकवणे, त्यांना दहशतवादाच्या मार्गावर नेणे आणि भारत सरकार आणि लोकशाही संस्थांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणे हा होता.