मुंबई: जीएसटी २.० लागू झाल्यानंतर अनेक फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. सरकारने जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी कंपन्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार, कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती घटवल्या असल्या, तरी यामुळे सुट्ट्या पैशांचे नवीन संकट निर्माण झाले आहे. या बदललेल्या किमतींमध्ये काही विचित्र आकडे आहेत. उदाहरणार्थ, पार्ले-जी बिस्किटचा ५ रुपयांचा पॅक आता ४.४५ रुपयांना मिळत आहे, तर २ रुपयांचा शॅम्पूचा सॅशे १.७७ रुपयांना झाला आहे. बॉर्नव्हिटाची किंमतही ३० रुपयांवरून २६.६९ रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
यामुळे एक रुपयांपेक्षा कमी किमतीचे व्यवहार कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या एक रुपयांपेक्षा कमी किमतीचे नाणे बाजारात उपलब्ध नाही, त्यामुळे ग्राहकांकडून पैसे घेताना आणि त्यांना परत करताना अडचणी येत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी कंपन्यांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. दीर्घकाळात किमती कमी करण्याऐवजी उत्पादनाचे वजन किंवा प्रमाण वाढवण्याचा पर्यायही कंपन्या विचारात घेत आहेत.
सध्या RSPL ग्रुपसारख्या काही कंपन्यांनी जुन्या स्टॉकवर १३% पर्यंत किमती कमी केल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांना जीएसटी कपातीचा फायदा तात्काळ मिळेल. मात्र, भविष्यात या विचित्र किमतींच्या समस्येवर तोडगा काढणे कंपन्यांसाठी एक मोठे आव्हान असणार आहे. यामुळे या कंपन्यांना वजन किंवा किंमत मॅनेज करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. वजन मॅनेज केले तर तोटा आणि किंमत मॅनेज केली तर नफा, अशा परिस्थितीत या कंपन्या अडकल्या आहेत.