गेल्या महिन्यात केंद्र सरकारनेजीएसटीच्या दरांमध्ये सुधारणा करत विविध वस्तूंवरील जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात ककेली होती. या बदलांनुसार आधीच्या जीएसटीमधील चार स्लॅब घटवून दोनच स्टॅब ठेवण्यात आले आहेत. या बदलांनंतर ५ टक्के आणि १८ टक्के असे जीएसटीचे दोनच प्रमुख स्लॅब उरले आहेत. याचा परिणाम दैनंदिन वापरातील सामानापासून ते महागड्या वस्तूंपर्यंत दिसत आहे. त्यामुळे जीएसटीमधून सरकारच्या होणाऱ्या उत्पन्नात घट होईल, असे मानले जात होते. मात्र सरकारकडून बुधवारी सप्टेंबर महिन्यातील जीएसटीमधून झालेल्या कमाईची आकडेवारी मांडण्यात आली त्यामधून वेगळंच चित्र समोर आलं आहे. बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सरकारी आकड्यांनुसार देशातील सप्टेंबर महिन्यातील जीएसटीच्या महसुलात वार्षिक सरासरीच्या ९.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ते १.८९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
जीएसटीमधून होणाऱ्या उत्पन्नाच्या गेल्या चार महिन्यातील तुलतेन झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. त्याशिवाय गेल्या नऊ महिन्यांमध्ये जीएसटीमधून जमणारा महसूल हा १.८ लाख कोटीहून अधिक राहिला आहे. ऑगस्ट महिन्यात जीएसटीमधील वाढ ६.५ टक्के होती. त्या तुलनेत या महिन्यात अधिक वाढ नोंदवली गेली आहे. जीएसटीमध्ये कपात करण्यात आल्याने काही वस्तूंची खरेदी ग्राहकांकडून पुढे ढकलण्यात आली होती. असं असतानाही जीएसटीमधून जमणारा महसूल वाढला आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये जीएसटी कलेक्शन हे ५.७१ लाख कोटी रुपये एवढं झालं आहे. हे वार्षिक सरासरीच्या ७.७ टक्के अधिक आहे. मात्र मागच्या तिमाहीतील ११.७ टक्के वाढीच्या तुलनेत कमी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारात वाढलेल्या जोखमीच्या पातळीवर देशांतर्गत व्यापाराच्या विकासावर लक्ष देत सरकारने जीएसटीमध्ये कपाती केली होती. या घोषणेमुळे ग्राहकांना फायदा होण्याबरोबरच टॅरिफच्या प्रभावापासून व्यवसायांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.