नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मंगळवारी इतिहास घडविताना आपल्या ‘झाडू’ने सर्वच पक्षांची सफाई केली. दिल्ली विधानसभेवरही कमळ फुलविण्याचे स्वप्न पाहणारा आणि मोदी लाटेवर स्वार झालेली भारतीय जनता पार्टीही यातून सुटली नाही. अवघ्या तीन जागांवर त्यांला समाधान मानावे लागले आहे. फक्त दोन वर्षांच्या कालावधीत आम आदमी पक्ष म्हणजेच ‘आप’च्या मतदानाचा टक्का दिल्लीत ५४.३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. डिसेंबर २०१३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तो ३३.०७ टक्के, तर २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ३२.०९ टक्के होता. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने ‘न भूतो’ असे यश मिळविताना सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनाही खोटे ठरविले. ‘आप’ला बहुमत मिळेल, असे मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्र्ष असले तरी विरोधकांचे अक्षरश: पानिपत होईल, अशी अपेक्षा कुणीही केली नव्हती. खुद्द ‘आप’च्या नेत्यांनाही एवढे प्रचंड यश अपेक्षित नव्हते. २०१३च्या विधानसभा निवडणुकीत आपने २९.४९ टक्के मते मिळविताना २८ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. ३१ जागा मिळविणाऱ्या भाजपाला ३३.०७ टक्के मते मिळाली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘आप’चा वाढता टक्का... सा-याच पक्षांचा बुक्का!
By admin | Updated: February 11, 2015 02:18 IST