मंगळवारी पहाटे अमृतसरच्या इस्लामाबाद पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यामध्ये कोणीही जखमी झालेले नसले तरी या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मोठ्या आवाजाबाबत विचारणा करण्यास गेलेल्या नागरिकांनाही पोलिसांनी काहीच सांगितले नाही. परंतू, पोलीस ठाण्यासमोरील घरांच्या काचांना तडे गेलेले दिसल्याने काहीतरी घडल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.
या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर हरप्रीत सिंग याचा खास हस्तक जीवन फौजी याने घेतली आहे. हरप्रीत हा परदेशात लपला आहे. याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
नागरिकांना पोलिसांनी काहीही सांगितले नसले तरी सकाळी साडेनऊच्या सुमारास लष्कराची एक तुकडी पोलीस ठाण्यात पोहोचली. यानंतर पोलीस आयुक्तही घटनास्थळी आले. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी सांगितले आहे.