तामिळनाडूतील सत्तारुढ डीएमके आणि राज्यपाल आर.एन. रवि यांच्या मोठा वाद सुरू झाला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरुनच हा वाद सुरू झाला. सरकारच्यावतीने तयार करण्यात आलेल्या भाषणातील काही मुद्दे राज्यपाल रवि यांनी गाळले होते. त्यावरुन, मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यपालांच्या भाषणातील या मुद्द्यांवरच भर दिला. तसेच, राज्यपालांच्या भाषणाबद्दल रोष व्यक्त केला, त्यानंतर राज्यपाल रवि यांनी विधानसभेतून वॉकआऊट केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे समर्थन केलं आहे.
राज्यपाल रवि यांनी आपल्या भाषणातून धर्मनिरपेक्षता, तामिळनाडू हे शांतीचे स्वर्ग आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के कामराज, सीएन अन्नदुराई आणि करुणानिधी यांसारख्या नेत्यांचा उल्लेख काढला. तसेच, द्रविडियन मॉडेलला अनुसरुनचेही भाषणा गाळून टाकले होते. सत्ताधारी डीएमके ज्या मॉडेलला प्राधान्य देते, ते मॉडेलही रवि यांनी न उल्लेख केल्यामुळे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सभागृहातच नाराजी बोलून दाखवली. सभागृहात त्यांनी एक प्रस्ताव मंजूर केला. ज्यामध्ये, राज्यपालांची कारवाई ही विधानसभेच्या परंपरेच्या विरोधात आहे, असे म्हटले. तसेच, काँग्रेस, वीसीके (VCK), सीपीआय, आणि सीपीआय (एम) यांनीही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला होता. तसेच, राज्यपालांविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर, राज्यपाल आरएन रवि यांनी सभागृहातून वॉक आउट केले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्र सरकार असाच स्वाभिमानी बाणा दाखवणार का, असा प्रश्न विचारला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा स्वाभिमानाने भरलेला हा स्वॅग वेगळाच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचं नाव न घेतल्यामुळे स्टॅलिन यांनी स्वाभिमानी बाणा दाखवला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.