माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी : १६ वर्षांहून अधिक काळ न्यायमूर्तीपदी होते सक्रिय
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी घोषित केली आहे. ते देशातील घटनात्मक न्यायालयांमध्ये १६ वर्षांहून अधिक काळ न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, “सर्व इंडिया आघाडीच्या पक्षांनी एकमताने एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. हे लोकशाहीसाठी मोठे यश आहे,” असे ते म्हणाले. मार्च २०१३ मध्ये ते गोव्याचे पहिले लोकायुक्त झाले, मात्र वैयक्तिक कारणास्तव सात महिन्यांतच त्यांनी राजीनामा दिला. सध्या ते हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय लवाद व मध्यस्थी केंद्राच्या विश्वस्त मंडळावर आहेत.
बी. सुदर्शन रेड्डी यांची कारकीर्द
जुलै १९४६ मध्ये जन्मलेले रेड्डी २ मे १९९५ रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात कायम न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले. ५ डिसेंबर २००५ रोजी ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. १२ जानेवारी २००७ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.८ जुलै २०११ रोजी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली.
विरोधकांसह सर्व पक्षांना केले ‘एकमता’चे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची एकमताने निवड करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विरोधकांसह सर्व पक्षांना केले. राधाकृष्णन यांनी आजवर सार्वजनिक आयुष्यात जनताजनार्दनाची जी सेवा केली त्याचे मोदी यांनी सत्ताधारी एनडीए आघाडीच्या खासदारांच्या बैठकीत कौतुक केले.
या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या इतर घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी राधाकृष्णन यांचा सत्कार केला. ते बुधवारी उपराष्ट्रपतिपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. राधाकृष्णन यांची ओळख पंतप्रधानांनी एनडीएच्या खासदारांना करून दिली. ते महाराष्ट्राचे राज्यपाल असून भाजपचे तामिळनाडूतील अनुभवी नेते आहेत.
एनडीएकडे बहुमताचा आकडा
सी. पी. राधाकृष्णन यांच्याबद्दल सांगितले की, ६७ वर्षांचे राधाकृष्णन अत्यंत साधे आयुष्य जगत असून त्यांच्याविषयी कोणताही वाद किंवा आरोप कधीही लागलेला नाही. त्यांची उपराष्ट्रपतिपदी निवड होणे ही अतिशय आनंदाची घटना ठरणार आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत असल्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे.