नवी दिल्ली : भारत सरकार जैन तेरापंथ धर्मसंघाचे दहावे अधिशास्ता आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांचे ‘स्मारक नाणे’ प्रकाशित करणार आहे. एक संत, योगी, तत्त्वज्ञ, लेखक, वक्ते आणि कवी म्हणून ओळखले जाणारे आचार्य श्री महाप्रज्ञ यांनी आपल्या विचारांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे.आचार्य श्री महाप्रज्ञ यांचा जन्म १४ जून १९२० रोजी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील टमकोर येथे झाला होता. गृहस्थ जीवनातील त्यांचे नाव नथमल चौरडिया होते. मुनी दीक्षा घेतल्यानंतर ते मुनी नथमल झाले आणि नंतर तेरापंथ धर्मसंघाचे आचार्य श्री महाप्रज्ञ म्हणून ख्यातनाम झाले.बीकानेरशी विशेष संबंधगंगाशहर येथे तेरापंथाचे नववे आचार्य श्री तुलसी यांनी मुनी नथमल यांना ‘महाप्रज्ञ’ हे नाव दिले आणि त्यांना भावी आचार्य घोषित केले. बीकानेर व गंगाशहर येथे ‘महाप्रज्ञ स्तंभ’, ‘महाप्रज्ञ बोनमॅरो सेंटर’, तसेच देशभरातील शाळा, संस्था आणि रस्त्यांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. ‘आचार्य महाप्रज्ञ इंटरनॅशनल स्कूल’ची शृंखलाही सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या जन्मगावी टमकोर येथे ‘आचार्य महाप्रज्ञ कॉलेज’ही कार्यरत आहे.
स्मारक नाण्याची वैशिष्ट्येतेरापंथ धर्म संघाशी निगडित नाण्यांचा संग्रह आणि अभ्यास करणारे सुधीर लुणावत यांच्या माहितीनुसार, हे नाणे शुद्ध चांदीचे, ४० ग्रॅम वजनाचे व ४४ मिमी व्यासाचे आहे. मुंबई टाकसाळीत तयार झालेले हे नाणे सुमारे ८,००० रुपये किमतीचे असण्याची शक्यता आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात अहमदाबाद येथे तेरापंथाचे विद्यमान आचार्य श्री महाश्रमण यांच्या उपस्थितीत नाण्याचे प्रकाशन होणार आहे. २४ जुलै २०२५ रोजी अर्थमंत्रालयाने याबाबत गॅझेट अधिसूचना जारी केली आहे.कोलकात्याच्या दीवा जैन (बैंगानी) यांनी या नाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या म्हणाल्या की, “आमचे आराध्य आचार्य महाप्रज्ञ यांच्यावर प्रकाशित होत असलेले नाणे संपूर्ण जैन समाजासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे.”
चांदीच्या नाण्याच्या दोन्ही बाजूंवर काय काय असेल?एका बाजूला आचार्य श्री महाप्रज्ञ यांचा फोटो असेल. वर हिंदीत आणि खाली इंग्रजीत ‘आचार्य श्री महाप्रज्ञ १०५ वी जयंती’ असे लिहिलेले असेल. फोटोच्या एका बाजूला १९२० हे जन्म वर्ष आणि दुसऱ्या बाजूला २०१० हे मृत्यू वर्ष आणि खाली २०२५ हे प्रकाशन वर्ष असणार आहे.नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभ, त्याखाली ₹ चिन्हासह ‘१००’ आणि दोन्ही बाजूंस ‘भारत’ व ‘INDIA’ लिहिलेले असेल.