नवी दिल्ली : लोकसभेमध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही गणपूर्तीअभावी कामकाज सुरू करण्यात विलंब झाल्यामुळे सरकारची पंचाईत झाली. दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास लोकसभेचे कामकाज सुरू होण्याची तयारी झाली असतानाही बहुतांश सत्तारूढ बाके रिकामीच होती. सत्तारूढ पक्षाचे सदस्य सभागृहात दिसत नसल्याने विरोधी पक्षांच्या सदस्यांनी शेरेबाजीही केली. गणपूर्तीशिवाय सभागृहाचे कामकाज चालविले जात नाही. गणपूर्तीसाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. सभागृहाची सदस्यसंख्या ५४३ आहे आणि कामकाज सुरू करण्यासाठी किमान ५५ सदस्य हजर राहणे आवश्यक आहे. या परिस्थितीवर ‘क्या हाल है’ अशी टिपणी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली तर ‘दररोज अशीच परिस्थिती असते’, असे बिजदचे भर्तृहरी महताब म्हणाले. २.१५ वाजता सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षांचे मिळून केवळ २० सदस्य हजर होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गणपूर्तीअभावी सरकारची नाचक्की
By admin | Updated: April 23, 2015 01:37 IST