नवी दिल्ली : देवच माझ्या प्राणांचे रक्षण करेल असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले. खलिस्तानवादी गटाने केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा कट आखल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. त्यावर केजरीवाल बोलत होते.
केजरीवाल म्हणाले की, ज्यांच्यावर देवाची कृपा असते त्यांना कुणीही मारू शकत नाही. ज्याचे जितके आयुष्य आहे, तितकेच तो जगणार. त्यानंतर प्रत्येकाला देवाघरीच जावे लागते. दरम्यान, मनी लाँडरिंग प्रकरणात केजरीवाल यांच्यावर खटला चालविण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने ईडीला दिली आहे
भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग - आपचा आरोपकेजरीवाल यांच्यावर खटला चालविण्यासाठी ईडीला केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली. हा भाजपने केलेला सत्तेचा दुरुपयोग आहे अशा आरोप आप पक्षाने बुधवारी केला. याआधी केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक ही अयोग्य कारवाई होती, असा आरोपही आपने केला. दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
- भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच नवी दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्याने भाजपचे ट्विट रिट्विट करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करून खुलेआम प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. - संजय सिंह, खासदार, आप