Vande Bharat Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. १४४ वर्षांनी आयोजित महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले अनेक भाविक आणि पर्यटक अयोध्येत जाऊन राम मंदिराला भेट देत आहे. २६ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी या कालावधीत तब्बल एक कोटीहून अधिक भाविक, पर्यटक अयोध्येत दाखल झाले. तसेच राम मंदिराच्या वेळेतही बदल करण्यात आहे. तुम्हालाही अयोध्येला जाऊन रामचरणी नतमस्तक व्हायचे असेल तर वंदे भारत ट्रेन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
देशातील विविध भागांत वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली ते अयोध्या दरम्यान वंदे भारत ट्रेनची नियमित सेवा आहे. या सेवेचा लाभ घेऊन अयोध्येला जाता येऊ शकते. ही वंदे भारत ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस दिल्लीतील आनंद विहार टर्मिनस येथून सुटते. आनंद विहार येथून सकाळी ६.१० वाजता निघते आणि सकाळी ११ वाजता कानपूर सेंट्रलला पोहोचते. त्यानंतर दुपारी १२.३५ वाजता लखनौला पोहोचते. दुपारी २.३० वाजता अयोध्येला पोहोचते.
अयोध्या वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर काय आहेत?
वंदे भारत ट्रेन अयोध्येहून दुपारी ३.२० वाजता निघते आणि ५.१० वाजता लखनौला पोहोचते. कानपूर सेंट्रलला सायंकाळी ६.३५ वाजता पोहोचते आणि रात्री ११.४० वाजता दिल्लीतील आनंद विहार येथे पोहोचते. दिल्ली ते अयोध्या या ट्रेनचे चेअर कार तिकीट दर १,६२५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट २९६५ रुपये आहे. अयोध्या ते दिल्ली वंदे भारतचे चेअर कारचे तिकीट १,५७० रुपये आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट २९१५ रुपये आहे.
राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्याची वेळ काय?
भाविकांची सोय आणि सुरक्षा लक्षात घेऊन राम मंदिर ट्रस्टने दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. ६ फेब्रुवारी २०२५ पासून रामललाच्या दर्शनासाठी नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, पहाटे ४ वाजता मंगला आरती होईल. सकाळी ६ वाजता शृंगार आरती होईल आणि त्यानंतर रामलला मंदिर सामान्य भाविकांसाठी उघडले जाईल. दुपारी १२ वाजता नैवेद्य दाखवला जाणार आहे. या काळातही भाविकांना दर्शन घेता येईल. संध्याकाळी ७ वाजता आरती होईल. या काळात मंदिराचे दरवाजे १५ मिनिटे बंद राहतील. रात्री १० वाजता शयन आरती होईल आणि त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद होतील.