हरीश गुप्ता, नवी दिल्ली‘टास्क मास्टर’ म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता स्वतंत्र प्रभार असलेल्या आपल्या डझनावर राज्यमंत्र्यांना नवे काम सोपवत त्यांना आणखी कार्यप्रवृत्त करण्यासाठी कंबर कसली आहे. लुटियन झोनमध्ये रममाण होऊ नका, तर जनतेत जा व मला जनतेचा अभिप्राय द्या, असे स्पष्ट निर्देश त्यांनी या मंत्र्यांना दिले.मंगळवारी मोदींनी स्वतंत्र प्रभार असलेल्या १३ केंद्रिय राज्यमंत्र्यांची बैठक घेतली. सुमारे ९० मिनिटांच्या या बैठकीत मोदींनी मंत्र्यांना आणखी कार्यप्रवृत्त होत, जनतेत जाऊन काम करण्याचे निर्देश दिले. भाजपाध्यक्ष अमित शहा हेही या बैठकीला हजर होते. भाजपप्रणित रालोआ सरकारने अलीकडे आणलेल्या योजना व धोरणांबाबत जनतेच्या प्रतिक्रिया नियमितपणे पंतप्रधान कार्यालयास कळविण्याचे निर्देश त्यांनी या सर्व मंत्र्यांना दिले. mygov.nic.in या अलीकडे सुरू केलेल्या पोर्टलवर तक्रारींचा पाऊस पडत आहे. नुकतेच मोदींनी रेल्वेगाड्यांना होणाऱ्या विलंबाचे कारण विचारत, बोर्डाच्या अध्यक्षांना कामाला लावले. विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांबाबत अनेक तक्रारी पंतप्रधान कार्यालयाकडे आल्यानंतर खुद्द मोदींनी याची दखल घेतली. त्यांनी दखल घेतलेली पाहून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू खडबडून जागे झाले आणि त्यांनी रेल्वे बोर्डाला याकामी लावले.
जनतेत जा अन् मला ‘फिडबॅक’ द्या
By admin | Updated: April 1, 2015 01:31 IST