लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारी तिजोरीत ९० हजार कोटी रुपये बेवारस पडून आहेत. या पैशांचा उपयोग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर करावा, अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.
राज्यसभेतील भाजपचे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी गुरुवारी संसदेतील कार्यालयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका आणि विमा कंपन्यांकडे ८८,७२२ कोटी रुपये अनेक वर्षांपासून बेवारस आहेत. हा निधी अनाथ मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा, अशी मागणी गोपछडे यांनी केली आहे.
एक लाख आत्महत्या...
स्टॅटिस्टा संस्थेच्या अहवालानुसार, मागील दहा वर्षांत एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. यामुळे लाखो मुले अनाथ झाली आहेत.
हुशार असूनही केवळ पैशांअभावी त्यांना शिक्षण घेता येत नाही. अशात, बँकांकडे पडून असलेले हजारो कोटी रुपये अनाथ मुलांवर खर्च करण्याचा विचार गांभीर्याने करावा. यासाठी सरकारने संस्था स्थापन करावी आणि बेवारस निधी त्यात वळता करावा, अशी विनंती अर्थमंत्र्यांना केली. शेतकरी आणि गरिबांची मुले अभ्यासात हुशार आहेत. आयपीएस अधिकारी होणारा कोल्हापूरमधील मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणे आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारा पुण्याचा शिवांश जागडे याचे ताजे उदाहरण असल्याचेही गोपछडे म्हणाले.