नवी दिल्ली : महाराष्ट्रातील वीज निर्मिती निम्म्यावर येण्याची शक्यता असून, राज्यातील वीज प्रकल्पांना कोळसा तसेच गॅस तातडीने मिळावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्राने आज केंद्राकडे केली.विदर्भातील बहुतांश वीज निर्मिती केंद्रात कोळसा पुरवठा कमी असल्याने त्यांचा वीज निर्मितीवर विपरीत परिणाम होत आहे. राज्याला दररोज ३२ रेक कोळशाची आवश्यकता असून राज्याला केवळ १५ रेक निष्कृट कोळसा पुरविला जात आहे असे ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी राजधानीत झालेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची ऊर्जा तसेच खणन मंत्र्यांच्या बैठकीत सांगितले. बैठकीला केंद्रीय ऊर्जा, कोळसा तसेच राज्यमंत्री पीयुष गोयल उपस्थित होते. राज्याचे ऊर्जा सचिव अजय मेहता, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक आशीष शर्मा यांनी राज्याच्या वीजनिर्मितीचे सादरीकरण केले. बैठकीत सांगण्यात आले, की कोराडी चंद्रपूर, परळी वीज निर्मिती केंद्राकरिता ओडिशा राज्यातील मच्छाकाटा खाणीतून कोळसा उपलब्ध होणार होता मात्र तेथील जाचक कायदेशीर अडचणींमुळे कोळसा उपलब्ध होण्यास विलंब लागत आहे. या प्रकल्पांना कोळशांची नितांत गरज आहे. दाभोळ येथील वीजनिर्मिती केंद्राकरिताही तातडीने गॅस उपलब्ध करून मिळावा जेणेकरून दाभोळ प्रकल्पातून १९०० मेगावॅट वीज निर्मिती करता येईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)
वीजनिर्मिती घटण्याआधी कोळसा द्या!
By admin | Updated: September 10, 2014 05:56 IST