गांधीनगर: गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून अमित शाहांनी मोठं मताधिक्क्य घेत आघाडी मिळवली आहे. भारतातल्या राजकारणातील आधुनिक चाणक्य म्हणून ओळख असलेल्या अमित शाहांनी लालकृष्ण अडवाणींचाही रेकॉर्ड तोडला आहे. सध्याच्या कलानुसार गांधीनगर मतदारसंघातून अमित शाह 5 लाखांहून अधिक मतांनी पुढे आहेत. त्यांनी अडवाणींचा 4.83 लाख मतदानाचा रेकॉर्ड तोडला आहे. शाह यांच्याविरोधात काँग्रेसनं डॉक्टर सी. जे. चावडा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं.अमित शाह पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना लालकृष्ण अडवाणींच्या जागी गांधीनगरमधून निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं आहे. गांधीनगर हा भाजपाचा अभेद्य किल्ला राहिला आहे. तिथून भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी खासदार होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या गांधीनगर जागेवरून भाजपाला नेहमीच विजयाची खात्री राहिली आहे. पक्षानं 1989पासून लागोपाठ या जागेवरून विजय मिळवला आहे. गांधीनगर जागेवरून 1967मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली. यात काँग्रेसचा विजय झाला होता. त्यानंतर वर्ष 1971मध्ये काँग्रेस, 1977च्या निवडणुकीत जनता दल आणि 1980च्या निवडणुकीत काँग्रेसनं विजय संपादन केला होता.
गांधीनगर लोकसभा निवडणूक निकाल: अमित शाहांनी तोडला लालकृष्ण अडवाणींचा रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 19:16 IST