Gujarat Gambhira Bridge Accident:गुजरातमधील वडोदरा येथे पूल कोसळण्याच्या गंभीर घटनेनंतर एक विचित्र घटना समोर आली आहे. वडोदरा येथे ९ जुलै रोजी महिसागर नदीवरील पुलाचा एक भाग कोसळून मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला आहे तर महिसागर नदीत बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. त्यानंतर आता वडोदरा जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तुटलेल्या पुलावर भिंत बांधली आहे. इतर वाहने या पुलावरुन पुढे जाऊ नये म्हणून ही भिंत बांधण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र पुलावर भिंत बांधताना रेस्क्यू ऑपेशन करणारी वाहने मागेच राहिली आहेत. प्रशासनाच्या या कृतीवरुन जोरदार चर्चा सुरु झालीय.
गुजरातमध्ये मुजपूरजवळील महिसागर नदीवर बांधलेला पूल ९ जुलै रोजी कोसळला. यात २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बचावकार्य अजूनही सुरू आहे. यानंतर स्थानिक प्रशासनाने केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला. पूल दुर्घटनेनंतर रविवारी रस्ते आणि पूल विभागाने अपघातस्थळाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी भिंत उभारली. यामुळे बचावकार्यक करण्यासाठी गेलेली वाहने भिंतीच्या दुसऱ्या बाजूला अडकली आहेत. गुगल मॅप्स सारख्या जीपीएस सेवा मार्गावरील बांधकाम सुरू असलेला पूल दाखवतात, ज्यामुळे अपघात होतात. कोणीही चुकूनही या पुलाचा वापर करू नये म्हणून ही भिंत बांधण्यात आली आल्याचे प्रशासनाचे म्हणणं आहे.
रस्ते आणि पूल विभागाने रविवारी कोसळलेल्या पुलावर तीन फूट उंच विटांची भिंत उभारली. यामुळे तीन वाहने अपघातग्रस्त पुलावर अडकून पडली आहेत. या तिन्ही गाड्यांचा वापर बचावकार्यासाठी करण्यात येत होता. स्थानिक लोकांनी भिंतीचे काम करताना वाहने अडकल्याबद्दल अधिकाऱ्यांना सांगितले होते.पण कोणीही याकडे लक्ष दिले नाही आणि सरकारी कामामुळे ही वाहने आता तिथेच अडकली आहेत. दुसरीकडे, या भिंतीत अडकलेली वाहने बचाव कार्याशी संबंधित आहेत, काम पूर्ण झाल्यावर ती बाहेर काढली जातील, असं प्रशासनाचे म्हणणे आहे. पण आता वाहने कशी बाहेर काढायची? भिंत तोडून की क्रेन आणून?
दरम्यान, प्रशासनाने भिंत बांधलेल्या ठिकाणी मुजपूर पोलिसांच चेकपोस्ट सुद्धा आहे. प्रशासन आपली चूक मान्य करण्याऐवजी काही प्रकारचे युक्तिवाद करून स्वतःचा बचाव करत आहे.