नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व भूपृष्ठवाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचा वादळी सामना मंगळवारी लोकसभेत होणार होता. पण राहुल यांना यावर बोलण्याची परवानगी लोकसभाध्यक्षांनी नाकारल्याने गडकरींच्या उत्तरावर समाधान मानून दोघांनाही नर्मविनोदी शैलीत हा विषय संपविला. गडकरी म्हणाले, ‘चुकीचे असते तर याठिकाणी घाबरलोही असतो, पण चुकीचे बोललोच नाही म्हणून स्पष्टीकरण देत आहे.’‘शेतकऱ्याने देव व सरकारवर विश्वास ठेवायला नको’ असे विधान गडकरी यांनी आपल्या भाषणात केल्याचे राहुल गांधी यांनी २० एप्रिल रोजी लोकसभेत सांगितले होते.गडकरी म्हणाले, महाराष्ट्रातील अमरावती येथे १० एप्रिल रोजी कृषी प्रदर्शनात आपण म्हटले,‘शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सुरू आहे. त्यांनी निराश होऊ नये. आत्महत्यांसारखा मार्ग पत्करू नये. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्र व साधनांचा वापर केला पाहिजे. सरकार व देवाच्या भरवशावर राहू नये. शेतकरी नवे प्रयोग व तंत्राचा वार करून आर्थिक व सामाजिक प्रगती करू शकतो.’गडकरी यांच्या स्पष्टीकरणानंतर सत्ताधाऱ्यांनी सुटकेचा निश्र्वास सोडला. मात्र विरोधकांचे समाधान होत नव्हते. तेव्हा राहुल यांनी माध्यमांमध्ये गडकरी यांचे विधान त्यांच्या नावाने प्रसिध्द झाले असल्याचा दाखला दिला व त्यास ज्योतिरादित्य शिंदे यांनीही दुजोरा दिला. तेव्हा गडकरी म्हणाले, कोणत्याच वृत्तपत्रात हे प्रसिध्द झालेले नाही. केवळ एका चॅनेलने हे विधान चुकीचे दाखविले. त्या आधारावर या सदस्यांनी आपल्या तोंडी ते घातले. (विशेष प्रतिनिधी)