नवी दिल्ली - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी जी-२० शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या जागतिक नेत्यांच्या सन्मानार्थ रात्रीभोजचे आयोजन केले होते. यात सहभागी पाहुण्यांनी भारतीय खाद्यपदार्थांसह संगीताचाही मनमुराद आनंद लुटला. वाद्यवृंदाने सुरसिंगार, मोहन वीणा, दिलरुबा आणि इतर दुर्मिळ भारतीय वाद्ये वाजवली. या वाद्यांच्या सुरावटींनी पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले.
राष्ट्रपती मुर्मू यांनी शनिवारी ‘भारत मंडपम’ या शिखर परिषदेच्या ठिकाणी जी-२० पाहुण्यांसाठी रात्रीभोजचे आयोजन केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि परिषदेसाठी आलेले अनेक देशांचे नेते यात सहभागी झाले होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रीभोज सुरू होण्यापूर्वी एका मंचावर पाहुण्यांचे स्वागत केले. पार्श्वभूमीवर बिहारमधील नालंदा महाविहाराचे (नालंदा विद्यापीठ) चित्र लावण्यात आले होते. ‘राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या रात्रीभोजमध्ये, भारताने आपला वैविध्यपूर्ण संगीत वारसा जगाला दाखवला,’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.