पेंटागनने नुकताच १९ देशांशी ३.५ अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक करार केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा AMRAAM (AIM-120) क्षेपणास्त्र करार मानला जात आहे. या कराराअंतर्गत इस्रायल, युक्रेन, ब्रिटन यांसारख्या महत्त्वाच्या देशांसह एकूण १९ देशांना AIM-120 Advanced Medium-Range Air-to-Air Missile पुरवली जाणार आहे. विशेष म्हणजे, हा करार अशा वेळी झाला आहे, जेव्हा जागतिक स्तरावर विशेषतः मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे.
या क्षेपणास्त्राचा वापर अमेरिका विविध संघर्षांमध्ये करत आहे. सीरिया व इराकमधील ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे, इस्रायलला इराणी आक्रमणांपासून वाचवणे, तसेच शत्रूंच्या ड्रोनचा नाश करणे, यासाठी AMRAAM यशस्वीरित्या वापरली गेली आहे. ही मिसाईल खराब हवामानातही अचूक मारा करू शकते, ज्यामुळे या मिसाईलचे सामरिक महत्त्व अधिक वाढले आहे.
अलीकडेच अमेरिकेने इजिप्तला AMRAAM क्षेपणास्त्र देण्याचा निर्णय घेतला, जी यापूर्वी कधीही तिथे पुरवली गेली नव्हती. आतापर्यंत इजिप्तच्या F-16 विमानांना AIM-7 Sparrow आणि AIM-9 Sidewinder सारख्या तुलनेत कमी क्षमतेच्या क्षेपणास्त्रांवर अवलंबून राहावे लागत होते. AMRAAM मुळे आता त्यांची हवाई ताकद वाढणार आहे.
AMRAAM क्षेपणास्त्राची मागणी अलीकडच्या काळात प्रचंड वाढली आहे. आतापर्यंत हजारो मिसाईल्स तयार करण्यात आल्या असून, ५,००० हून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील संघर्ष आणि जागतिक तणाव यामुळे साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे आता उत्पादन वेगाने वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे.