गेल्या काही काळापासून ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढलं आहे. आता एका व्यापाऱ्याला ऑनलाइन ट्रेंडिंगच्या नावाखाली ६.५२ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचं .समोर आलं आहे. या फसवणुकीची सुरुवात ही एका डेटिंग अॅपवरील मैत्रीपासून झाली होती. त्यानंतर सदर व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी पीडित व्यापारी दलजित सिंग यांनी सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दलजित सिंग हे दिल्लीतील एका कंपनीचे मालक आहेत. त्यांनी तक्रारीमध्ये सांगितले की, डिसेंबर २०२४ मध्ये माझी भेट अनिता चौहान नावाच्या महिलेसोबत झाली होती. तिने मला ऑनलाइन ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच या गुंतवणुकीत कुठल्याही अनुभवाशिवाय चांगला फायदा होतो, असे सांगितले. सुरुवातीला काही नफा झाल्यावर दलजित सिंग यांनी तब्बल ६.५२ कोटी रुपयांची गुंवणूक केली.
मात्र दलजित सिंग यांनी हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असलेल्या SpreadMKT आणि Sprecdex.cc ने सिक्युरिटी शुल्क आणि ६१ लाख रुपयांच्या एक्सचेंज शुल्काची मागणी केली. या प्रकारानंतर दलजित यांना आपली फसवणूक होऊ शकते, अशी शंका आली. त्यानंतर त्यांनी इतर पीडितांशी संवाद साधला. तेव्हा अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आता नोएडामधील सायबर क्राईम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील तपासास सुरुवात केली आहे. तर पोलीस संबंधित वेबसाईट आणि बँक खात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, दलजित सिंग यांनी संबंधित महिलेचा संपर्क क्रमांक आणि सर्व देवाण घेवाणीची माहिती पोलिसांना दिली आहे, आता या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.