नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रभावापुढे नमते घेत दिल्ली विद्यापीठाने वादग्रस्त ठरलेला चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम रद्द करून तीन वर्षाचा जुनाच अभ्यासक्रम स्वीकारण्याचे मान्य केले आहे. कुलगुरू दिनेश सिंह यांनी सर्व प्राचार्याना नव्या सत्रसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यास सांगितले.
या निर्णयाने प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन अनिश्चिततेवर पडदा पडला आहे. विद्यापीठातील 64 महाविद्यालयांत असलेल्या 54 हजार जागांकरिता सुमारे 2.7 लाख विद्याथ्र्यानी अर्ज दाखल केले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाला चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम मागे घेऊन तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश देण्याचे निर्देश जारी केले होते.
वादावर भाष्य नाही- इराणी
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी विद्यापीठ अनुदान आयोग व दिल्ली विद्यापीठादरम्यान चार व तीन वर्षाच्या अभ्यासक्रमावरून सुरू असलेल्या वादाबद्दल संवैधानिक मर्यादांमुळे भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्या येथे एका शाळेच्या कार्यक्रमाकरिता आल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)