नवी दिल्ली - एनआरसी आणि नागरिकता संशोधन विधेयक या मुद्दांवर शाहीन बागेत सुरू असलेले आंदोलन देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. याच आंदोलनात एका महिलेच्या चार महिन्याच्या चिमुकल्याचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. मात्र त्या चिमुकल्याचे आई-वडील अजुनही आंदोलनावर ठाम आहेत.
चार महिन्याच्या मोहम्मद जहां याला त्याची आई रोज शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनात घेऊन जात होती. येथे अनेक आंदोलक मुलाला खेळवत होते. मात्र मोहम्मद यापुढे कधीही शाहीन बागेत दिसणार नसून गेल्या आठवड्यात थंडीमुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र त्याची आई अजुनही शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यावर ठाम आहे. त्यांच्यानुसार हे आंदोलन माझ्या दुसऱ्या मुलाच्या भवितव्यासाठी आहे.
मोहम्मदचे आई-वडील नाजिया आणि आरिफ हे बाटला हाऊस येथे राहतात. त्यांना आणखी दोन मुलं आहेत. मात्र तरी देखील या आंदोलनात आम्ही सहभागी होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सीएए या कायद्यामुळे धर्माच्या नावावर लोकांना विभागण्याचा डाव आहे. हा कायदा लागू करू नये. हा कायदा माझ्या मुलांच्या भविष्याच्या विरोधात असल्याचे नाजिया यांनी सांगितले.