Former IPS Shivdeep Lande:बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे विविध पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झालीय. अशातच बिहारच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारमध्ये सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेले आणि भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त झालेल्या शिवदीप लांडे यांनी राजकीय इनिंग सुरू केली आहे. शिवदीप लांडे यांनी त्यांच्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. शिवदीप लांडे यांनी त्यांच्या नवीन पक्षाचे नाव हिंद सेना ठेवले आहे. मंगळवारी त्यांनी पक्षाचे नाव जाहीर करताना हिंद सेना पक्ष आगामी विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
बिहारचे प्रसिद्ध माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी मंगळवारी राजकारणात प्रवेश केला आणि त्यांचा नवीन राजकीय पक्ष 'हिंदू सेना' स्थापन केल्याची घोषणा केली. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटण्यातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना लांडे म्हणाले की, त्यांचा पक्ष राष्ट्रवाद, सेवा आणि समर्पणाच्या तत्त्वांवर काम करेल आणि बिहारमधील लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेल.
बिहार विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी शिवदीप लांडे यांनी हिंदू सेना पक्षाची घोषणा केली. बिहारच्या २४३ जागांवर उमेदवार आणि चेहरा कोणीही असो, शिवदीप वामनराव लांडे प्रत्येक जागेवर निवडणूक लढवणार आहे असं समजा. आमच्या विचारसरणीचे पालन करणाऱ्यालाच पक्षाचा उमेदवार बनवले जाईल, असे शिवदीप लांडे म्हणाले. शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील आहेत, परंतु ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. व्हीआरएस घेतल्यानंतरही त्यांनी बिहार सोडणार नसल्याचे जाहीर केले होते.
आयपीएसची नोकरी सोडल्यानंतर मला राज्यसभेवर पाठवण्यापासून ते मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवण्यापर्यंतच्या ऑफर आल्या. पण मी त्या सर्व नाकारल्या. तरुणांची स्थिती आणि दिशा बदलण्यासाठी मी हिंदू सेना नावाचा एक नवीन पक्ष स्थापन करत आहे. पक्षाच्या नावावरुन त्यांनी पोलीस दलातील नोकरीचा अनुभव सांगितला आणि म्हणाले की तेव्हा लोक त्यांना जय हिंद म्हणायचे. गेल्या काही महिन्यांत मी बिहारमधील गावे आणि मागासलेल्या भागांचा दौरा केला, जिथल्या वास्तवाने मला राजकारणात प्रवेश करण्यास प्रेरित केले असेही शिवदीप लांडे म्हणाले.
"मी पोलिसिंग केले आहे त्यामुळे मला माहिती आहे की बिहारमध्ये दरवर्षी सुमारे २७०० ते ३००० खून होतात. यापैकी सुमारे ५७ टक्के खून जमिनीच्या वादातून होतात. म्हणजेच दरवर्षी १५०० हून अधिक लोक केवळ जमिनीच्या वादात मारले जातात. दररोज ४ ते ५ लोकांचा मृत्यू होतो. आता विचार करा, यामध्ये सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल? अनेकांना वाटते की न्याय त्यांच्या खिशात आहे पण माझ्या पक्षाची न्याय ही संकल्पना फक्त त्यांच्यासाठी आहे जे खरोखरच गरीब, वंचित आणि पीडित आहेत," असे शिवदीप लांडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.