खिजरी: कांद्याच्या वाढत्या दरांचा मुद्दा देशभरात गाजताना दिसत आहे. संसदेत कांद्यानं वातावरण तापवल्यावर आता हा विषय निवडणूक प्रचारातही आला आहे. मी फार कांदा खात नाही, असं म्हणणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही काय खाता, हे कोणी विचारलंय का, असा सवाल राहुल यांनी सीतारामन यांचा विचारला आहे. झारखंडच्या खिजरी विधानसभा मतदारसंघातल्या प्रचारसभेत ते बोलत होते. निर्मला सीतारामन यांनी कांदा प्रश्नावर भाष्य करताना, मी फार कांदा खात नाही. माझ्या कुटुंबातही फार कांदा, लसूण खाल्ला जात नाही, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर राहुल गांधींनी शरसंधान साधलं. 'तुम्ही काय खाता, हे कोणी विचारलं का? तुम्हाला जे खायचंय ते खा. पण बेरोजगारीच्या दरानं ४५ वर्षांतला उच्चांक का गाठलाय ते देशाला सांगा. शेतकरी आत्महत्या का करतोय? रोजगार का मिळत नाही?, याची माहिती देशाला द्या' असं राहुल गांधी म्हणाले. देशासमोरच्या गंभीर प्रश्नांची उत्तरं सीतारामन देत नाहीत. मात्र मी कांदा, लसूण खात नाही, हे त्या आवर्जून सांगतात, अशा शब्दांत राहुल यांनी अर्थमंत्र्यांना टोला लगावला. राहुल यांनी जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरुनदेखील भाजपाला धारेवर धरलं. 'एका बाजूला भाजपा केवळ श्रीमंतांसाठी काम करते, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस गरिबांसाठी-शेतकऱ्यांसाठी काम करते. त्यामुळे आता तुम्हाला कोणतं सरकार हवं याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे,' असं आवाहन राहुल यांनी केलं.
तुम्ही काय खाता, हे कोणी विचारलंय का?; कांद्यावरुन राहुल गांधींचा निर्मला सीतारामन यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 16:58 IST