तिरुपती : ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि आसामचे माजी राज्यपाल जानकी वल्लभ पटनायक यांचे मंगळवारी येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्युपूर्वी काही तासाआधी त्यांनी तिरुमला येथील वेंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली होती.मंदिर परिसरातील श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे संचालक आणि कुलपती डॉ. बी. वेंगम्मा यांनी पटनायक (८९) यांचे निधन झाल्याचे सांगितले. राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. वेंगम्मा म्हणाले, सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यांना वाचवू शकलो नाही. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुरी येथे अंत्यसंस्कार केले जातील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पटनायक तीन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री राहिले होते. ओडिशा सरकारने पटनायक यांच्या सन्मानार्थ मंगळवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे, तसेच आठवडाभराच्या राजकीय दुखवट्याचीही घोषणा केली आहे.(वृत्तसंस्था)
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री जे.बी. पटनायक कालवश
By admin | Updated: April 22, 2015 00:35 IST