पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचे आणि त्यांच्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे त्याचा पलटवार करण्यासाठी दहशतवादी पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने पुन्हा जमू लागले आहेत. अशातच दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सीमेवर बीएसएफ डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा आणि पुराचा फटका भारत-पाकिस्तान सीमेवर घातलेल्या कुंपणाला बसला आहे. याही परिस्थितीत बीएसएफचे जवान पाण्यात उभे राहून खडा पहारा देत आहेत.
सीमेवरील सुमारे ९० बीएसएफच्या चौक्या या पुराच्या पाण्यात आहेत. पंजाबच्या सर्वच्या सर्व २३ जिल्ह्यांतील १४०० हून अधिक गावे पुराच्या पाण्यात बुडालेली आहेत. पंजाबमधील पाळीव प्राणी पुराच्या पाण्यातून पाकिस्तानात वाहून जात असल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. अशातच सीमेवरील सुमारे ११० किमी लांबीच्या लोखंडी तारांच्या कुंपणाची पडझड झाली आहे. पंजाबसोबत जम्मूची पाकिस्तानला लागून असलेली सीमा देखील पुराच्या पाण्यात आहे.
बीएसएफने तातडीने या कुंपणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. कारण या पाण्यातूनही दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करणार आहेत. भारत-पाकिस्तानदरम्यानची २,२८९ किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा राजस्थान, गुजरात, पंजाब आणि जम्मूमधून जाते. यापैकी बीएसएफकडे जम्मूमध्ये सुमारे १९२ किमी आणि पंजाबमध्ये ५५३ किमी एवढ्या मोठ्या सीमेची जबाबदारी आहे. पुराच्या पाण्यामुळे पंजाबमध्ये सुमारे ८० किमी आणि जम्मूमध्ये सुमारे ३० किमीचे कुंपण पाण्याखाली गेले आहे किंवा उखडले गेले आहे. अनेक ठिकाणी कुंपणच वाहून गेलेले आहे.
जम्मूमधील सुमारे २० बीएसएफ चौक्या (सीमा चौक्या) आणि पंजाबमधील ६५-६७ चौक्या पुराच्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. उंचावरील चौक्यांचीही पडझड झाली आहे. यामुळे ड्रोन, मोठ्या सर्चलाइट्स, बोटींद्वारे या भागात गस्त घातली जात आहे.