नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमधल्या एखाद्या नागरिकाबाबत कुणी जर त्यांची संस्कृती, शारीरिक ठेवण वा कुळाबाबत शेरेबाजी केली अथवा तसे हावभाव केले तर त्या व्यक्तीला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागू शकते; कारण, तसा एक प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे सादर करण्यात आला असून मंत्रालय त्यावर विचार करीत आहे. दिल्लीसह देशाच्या अन्य भागात ईशान्येकडील नागरिकांवर, विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांची चौकशी करणाऱ्या समितीने या नागरिकांवर होत असलेल्या शेरेबाजीवर पायबंद घालण्याबाबतचा एक प्रस्ताव गृहमंत्रालयाला दिल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी येथे सांगितले. भारताच्या ईशान्य दिशेला असलेल्या राज्यांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांच्याविषयी कुणी चायनीज, चिंकी वा तत्सम अपमानकारक उद््गार काढल्यास त्या व्यक्तीला शिक्षा ठोठावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती सुचविणारे एक विधेयक (२०१४ च्या कलमानुसार) सादर केले जाणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. हा प्रस्ताव विचाराधीन असून, फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम २०१४ नुसार दोन अधिक तरतुदी त्यात समाविष्ट केल्या जाण्यावरही विचार होत असल्याचे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बेझबरुआ समितीने सादर केलेल्या या अहवालात, ईशान्येकडील नागरिकांची सर्वात मोठी मागणी, त्यांना मोमोज, चिंकी, चायनीज या अर्थाचे अपमानकारक संबोधन लावणे हा दंडनीय अपराध ठरावा अशी होती. कोणी असे अपमानकारक शब्द उच्चारले, लिहिले किंवा तसे हावभाव केले तर त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जावी यासाठी भादंविच्या १५३ या कलमात तशी तरतूद करावी असे या समितीने म्हटले आहे. या समितीने, जर कोणी त्या वंशाच्या सदस्यांमध्ये धोक्याची वा भयाची भावना निर्माण करील किंवा ज्यामुळे अशी भावना निर्माण होण्याची शक्यता आहे त्यालाही ही शिक्षा लागू केली जावी, असे म्हटले आहे.