भारत पाकिस्तान तणावादरम्यान, भारतीय लष्कराने एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये कसा विध्वंस झाला आहे, हे पाहायला मिळत आहे. ८ आणि ९ मेच्या रात्री, पाकिस्तानी सैन्याने ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करून पश्चिम सीमेवर अनेक हल्ले केले. यासोबतच, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात येत होते. या हल्ल्यांचा उद्देश भारतीय सीमेवर घुसखोरी आणि अस्थिरता पसरवणे हा होता. मात्र, भारतीय सैन्याने हे सर्व ड्रोन हल्ले उधळून लावले आणि पाकिस्तानच्या गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर दिले.
देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे भारतीय लष्कराने स्पष्टपणे म्हटले आहे. या सोबतच पाकिस्तानच्या कोणत्याही नापाक कटाला पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल, असे देखील भारतीय लष्कराने म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ
पाकिस्तानचा प्रयत्न भारताने लावला उधळून!
अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, जम्मू, पठाणकोट, उधमपूर आणि इतर काही ठिकाणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा प्रयत्न गुरुवारी भारताने उधळून लावला. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आज, जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरमधील लष्करी प्ठिकाणांना पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. पाकिस्तानने जम्मूमधील सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया शहरांवरही क्षेपणास्त्रे डागली होती, परंतु भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ती उधळून लावली."