ऑनलाइन लोकमत
इम्फाळ, दि. 15 - गोव्या पाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी बुधवारी दुपारी एन. बिरेन सिंग यांना मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मणिपूरमध्ये प्रथमच भाजपाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले आहे. भाजपाला नागा पीपल्स फ्रंटने (एनपीएफ) पाठिंबा दिला.
एनपीएफचे राज्यात चार आमदार आहेत. त्यांनी मंगळवारी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. एनपीएफ हा केंद्रात रालोआचा घटक पक्ष आहे. एनपीएफपूर्वी नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) चार आमदारांनी भाजपाला पाठिंबा घोषित केला होता. एनपीएफच्या चार आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करण्यास पाठिंबा दर्शविला, असे राजभवनातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत आपल्याला ३२ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपाने केला आहे. भाजपा शिष्टमंडळाने रविवारी २८ आमदारांसह राज्यपालांची भेट घेतली होती. भाजपाच्या २१ आमदारांखेरीज ४ एनपीपीचे आमदार, लोजपा आणि तृणमूल काँग्रेसचा प्रत्येकी एक तसेच एका काँग्रेस आमदाराचा समावेश होता. गोव्या प्रमाणे मणिपूरमध्येही काँग्रेस नंबर 1 पक्ष आहे. पण बहुमताचा आकडा जमवण्यात अपयशी ठरल्याने इथेही काँग्रेसची सत्ता स्थापनेची संधी हुकली.
#FLASH BJP's N.Biren Singh sworn in as Chief Minister of Manipur pic.twitter.com/5FDk1d3y4R— ANI (@ANI_news) March 15, 2017