फायनल- भुजबळ-पंकजा मुंडेंच्या भेटीने तर्क-वितर्कांना ऊत
By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST
जे. जे. मध्ये जाऊन विचारपूस : सोशल मीडियात टीका
फायनल- भुजबळ-पंकजा मुंडेंच्या भेटीने तर्क-वितर्कांना ऊत
जे. जे. मध्ये जाऊन विचारपूस : सोशल मीडियात टीकामुंबई : आर्थर रोड जेलमधून उपचारांसाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्कांना ऊत आला आहे. सोशल मीडियात यावर सडकून टीका होत आहे.'भुजबळ यांच्याशी पहिल्यापासून माझे कौटुंबिक संबंध असल्याने मी त्यांची भेट घेतली,' असे पंकजा यांनी नंतर पत्रकरांना सांगितले. पंकजा यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे मोठे ओबीसी नेते होते. भुजबळ यांचीदेखील राष्ट्रवादीतील बडे ओबीसी नेते अशी ओळख आहे. वेगवेगळ्या पक्षांत असले, तरी मुंडे आणि भुजबळ यांचे घनिष्ठ संबंध होते. भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते असल्याचे मुंडे यांनी जाहीरपणे सांगितले होते. मराठा समाजाच्या मोर्चांनी सध्याचे वातावरण ढवळून निघालेले असताना पंकजा यांनी भुजबळ यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उभयतांच्या या भेटीवर सोशल मीडियात चर्चेला ऊत आला आहे. ही भेट राजकीय हेतूने प्रेरित आहे. युती सरकारच्या कारकिर्दीत भुजबळ यांच्यावर अटकेची कारवाई झाली. याच सरकारच्या जबाबदार मंत्री पंकजा या भुजबळांना भेटतात, हे खटकणारे आहे. त्यांना आत्ताच का वेळ मिळाला, असे अनेक सवाल सोशल मीडियातील चर्चेत उपस्थित करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर, पंकजा यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपी असलेले भुजबळ यांची भेट घेतल्याने टीकेची झोड उठली आहे. पंकजा सुमारे २० मिनिटे भुजबळ यांच्याशी बोलल्या. या वेळी भुजबळ यांचे कुटुंबीय हजर होते. रुग्णालयातील डॉक्टरांकडूनही पंकजा यांनी भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. (विशेष प्रतिनिधी)