गेल्या काही काळात सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्ट करून लोकांना गंडा घातल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान, आता या सायबर गुन्हेगारांनी चक्क रिझर्व्ह बँकेच्या एका माजी अधिकाऱ्यालाच आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे रिझर्व्ह बँकेचे माजी अधिकारी असलेल्या एका ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या पत्नीसह सुमारे १५ दिवस डिजिटल अरेस्ट ठेवून त्यांची या सायबर गुन्हेगारांनी ३.१४ कोटी रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी या वृद्ध दाम्पत्याला आपण ट्राय, पोलीस, सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांच्यावर मानसिक दबाव आणला आणि त्यांच्याकडील आयुष्यभराची कमाई हडप केली.
मिळालेल्या माहितीनुसार सेक्टर ७५ मध्ये राहणाऱ्या रिझर्व्ह बँकेचे माजी अधिकारी असलेल्या ७८ वर्षीय व्यक्तीला २५ फेब्रुवारीला एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण ट्रायचे अधिकारी असल्याची बतावणी केली. तसेच त्यांच्याकडे एका जुन्या मोबाईल क्रमांकाबाबत विचारणा केली. मात्र सदर वृद्ध व्यक्ती तो क्रमांक विसरले होते. काही वेळातच त्यांच्याविरुद्ध मुंबईतील कुलाबा येथे मनी लाँड्रिंग आणि गुंतवणुकीतील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर कुलाबा पोलीस ठाण्यामधून कथित अधिकारी विजय खन्ना आणि सीबीआय अधिकारी राहुल गुप्ता यांनी या वृद्ध व्यक्तीला फोन केला. तसेच आता तुम्हाला भारताच्या सरन्यायाधीशांसमोर ऑनलाइन सुनावणीसाठी हजर केलं जाईल असं सांगितलं. हे प्रकरण नरेश गोयल यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग केसचं आहे. तसेच तुमची बँक खाती लवकरच गोठवण्यात येतील, असे सांगितले.
सदर माजी अधिकाऱ्याने आपलं वय ७८ वर्षे आणि पत्नीचं वय ७१ वर्षे असल्याचं सांगितलं तेव्हा या ठकांनी त्यांच्यावर ऑनलाइन चौकशीसाठी सहकार्य करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. तसेच राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने याबाबत कुणाशीही बोलू नका, असेही त्यांनी या वृद्ध दाम्पत्याला बजावलं. एवढंच नाही तर अशी माहिती कुणाला दिल्यास तुम्हाला त्वरित अटक केली जाईल, असेही सांगितले.
या धमकीमुळे हे वृद्ध दाम्पत्य एवढं घाबरलं की, त्यांनी आपली आयुष्यभराची कमाई असलेले ३.१४ कोटी रुपये आरोपींनी सांगितलेल्या कथित सिक्रेट सुपरव्हिडजन अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले. पडताळणीनंतर हे पैसे परत मिळतील, असे या दाम्पत्याला वाटत होते. या दरम्यान, या दाम्पत्याला ३ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाचा एक कथित आदेशही प्राप्त झाला. त्यात त्यांच्याकडील रक्कम वैध असून, ती ६ ते ७ दिवसांमध्ये परत मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र बरेच दिवस लोटल्यावरही हे पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे या वृद्ध दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यानंतर या दाम्पत्याने घडलेल्या घटनेची तक्रार राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर केली. आता या प्रकरणी सायबर क्राईम पोलीस पुढील तपास करत आहेत.