नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश केला असून यामुळे राजधानीतील वाहतूक ठप्प झाली आहे. दिल्ली नोएडा फ्लायवेवर आंदोलन सुरु केल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीमध्ये मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांशी पोलिसांनी संपर्क साधत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी पंतप्रधान निवासाला घेराव घालण्याच्या भुमिकेवर ठाम राहिले. तसेच रास्तारोको केल्याने डीएनडी नगरमधील सर्व रस्ते ठप्प झाले आहेत.
उत्तर प्रदेशमधील अलीगढ जवळील 500 शेतकरी दिल्लीमध्ये आले आहेत. शेतकरी नेता मनवीर तेवनिया हे त्यांचे नेतृत्व करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी डीएनडी फ्लाय़वे बंद केला आहे. टप्पल गावातील शेतकऱ्यांच्या भूमी अधिग्रहनवरून नव्या कायद्यानुसार भरपाई मिळावी अशा मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.