गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये सातत्याने गुन्हे घडत आहेत. राज्यात गुन्हेगार मोकाट असून, गोळीबार, खून यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहेत. अशावेळी जनतेच्या सुरक्षेबाबत विचारलं असता बिहार पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
बिहार पोलीस दलातील एडीजी एसटीएफ कुंदन कृष्णन यांनी सांगितले की, बिहारमध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात शेतकऱ्यांना फारशी कामं नसतात. त्यामुळे या महिन्यांमध्ये खुनासारखे गुन्हे अधिक घडतात. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाकडे फारसं गाम नसतं, याचदरम्यान, गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं.
त्यांनी पुढे सांगितले की, पाऊस पडताच शेतकरी शेतीच्या कामांमध्ये गुंततात. त्यामुळे खुनासारख्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी होतं. बेरोजगारी आणि मोकळा वेळ यामुळे तरुण पैशांच्या मोहापायी सुपारी घेऊन हत्या करण्यासारख्या गुन्ह्यांकडे आकर्षित होत आहेत. एडीजी कुंदन कृष्णन यांनी सांगितले की, खुनासारखे गुन्हे संपूर्ण राज्यामध्ये घडत असतात. मात्र सध्या निवडणुकीचं वातावरण असल्याने राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे त्याकडे अधिक लक्ष देत आहेत, असेही ते म्हणाले.
मात्र आता कुंदन कृष्णन यांनी केलेल्या या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलिसांजी जबाबदारी नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकरी आणि तरुणांना गुन्हेगारीसाठी दोषी ठरवून पोलीस आपली जबाबदारी टाखू शकताता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.